सुखाची निद्रा कशी घ्याल?
रोज प्रत्येकाला रात्री काही विशिष्ट काळापर्यंत गाढ झोप लागलीच पाहिजे. जे काही कारणास्तव रात्री जागरण करतात त्यांच्या त्रिदोषाचे असंतुलन होऊन वात दोषाचे आधिक्य निर्माण होते. त्यामुळे सर्व अंग दुखणे, अस्वस्थ वाटणे, आम्लपित्ताचा त्रास होणे, डोळ्याखाली काही वर्तूळ निर्माण होणे. काम करण्याचा उत्साह नसणे, कुठल्याही कार्याचे पूर्णत-हेने आकलन न होणे, अशी अनेक लक्षणे अनिद्रेमुळे उद्भवतात. रात्री किती झोप घ्यायला हवी? खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न होय.
झोप लागलीच पाहिजे.
रात्र रात्र झोप न येणार्यास विचारा निद्रादेवीस प्रसन्न करणे किती कठीण असते. गादीवर पडल्या पडल्या एखाद्या पुस्तकाच्या दोन चार ओळी वाचल्या न वाचल्या तर झाले झोपच्या आधीन. अहाहा! हे निद्रासुख होय. ज्यांना ते भेटते त्यांना त्याचे महत्त्व वाटणार नाही, पण हे सुख काय आहे याचे वर्णन रात्री जागणार्यांना विचारा. आयुर्वेदात त्रयोस्तंभ वर्णन केले आहे. त्यापैकी एक म्हणजे निद्रा होय. रोज प्रत्येकाला रात्री काही विशिष्ट काळापर्यंत गाढ झोप लागलीच पाहिजे. जे काही कारणास्तव रात्री जागरण करतात त्यांच्या त्रिदोषाचे असंतुलन होऊन वात दोषाचे आधिक्य निर्माण होते. त्यामुळे सर्व अंग दुखणे, अस्वस्थ वाटणे, पाय, पिंडर्या दुखणे, अम्लपित्ताचा त्रास होणे, त्वचा कोरडी निस्तेज होणे, केस गळणे, डोळ्याखाली काही वर्तूळ निर्माण होणे. शौचास साफ न होणे, भूक मंदावणे, काम करण्याचा उत्साह नसणे, डोळे जड वाटणे, डोळे जळजळ करणे, कुठल्याही कार्याचे पूर्णतºहेने आकलन न होणे, अशी अनेक लक्षणे अनिद्रेमुळे उद्भवतात. रात्री किती झोप घ्यायला हवी? खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न होय. तरी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने ज्या झोपेमुळे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते, उठल्यानंतर कुठल्याही प्रकारची मरगळ राहत नाही. शरीर हलके वाटते. डोळे, डोके जड वाटत नाही. जी झोप स्वत:हून पूर्ण होऊन मनुष्यास जागृत करते, अशा झोपेस सामान्य झोप म्हणता येईल. रात्री लवकर म्हणजे नऊ ते दहा वाजेपर्यंत मनुष्याने निद्राधीन व्हायला हवे. तर सकाळी म्हणजे 3 ते 4 वाजेपर्यंत उठायला हवे. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये कमीत कमी दोन तासाचा कालावधी असायला हवा. हा आयुर्वेदिक सिद्धांत.
हितकर आहार, भरपूर श्रम, व्यायामाचा अवलंब
एखाद्या मजुराच्या जीवनाकडे पाहिले तर कुण्याही रात्रंपाळी करणार्या मनुष्यास हेवा वाटेल. दिवसभर राबराब राबून धोंड्यावरसुद्धा गाढ झोप येईल. आपण दिवसभर योग्य दिनचर्येचे पालन केल्यास, योग्य हितकर आहार सेवन केल्यास आणि भरपूर श्रम केल्यास, व्यायामाचा अवलंब केल्यास, सुख- दु:खाची तमा न बाळगल्यास अंथरुणावर लवंडलो की पापण्या जड होऊन डोळे झोपेसाठी पटकन मिटतील व आपणास कळणारही नाही. हे वरील सर्व उपाय अमलात आणल्यानंतरसुद्धा आपणास समाधानकारक झोप येत नसल्यास झोपेची गोळी घेण्यापेक्षा आपण काही आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करून घ्यावा. त्यात विशेषत: स्नेहन, स्वेदन आणि शिरोधारा याचा आपणास फायदा होतो. स्नेहन म्हणजे काही विशिष्ट आयुर्वेदिक तेलाने पूर्ण शरीराला प्रावीण्य असणार्यांकडून मालीश करून घ्यावी. व नंतर सर्वांगाला आयुर्वेदिक औषधाने सिद्ध काढण्याची वाफ दिली जाते. त्यामुळे शरीरास लाघवता प्राप्त होते. दोषाचे निर्मूलन होऊन झोप येण्यास मदत होते. तसेच शिरोधारा यामध्ये कपालभागी औषधी सिद्ध तेलाची धारा 30-35 मिनिटांपर्यंत सोडण्यात येते. नंतर डोक्याची मालीश केली जाते. कित्येकदा असा अनुभव येतो की रुग्णांना शिरोधारा करता करताच झोप लागून जाते. मग आज रात्री झोप न आल्यास वरील उपायांनी करणार का निद्रादेवीची आराधना?
झोप येत नाही त्यासाठी काही साधे व सोपे उपाय
रोज रात्री तळपायाची एरंड तेलाने दहा मिनिटांपर्यंत मालीश करावी.
अथवा काशाच्या वाटीने गायीचे तूप तळपायांना घासून लावावे. यामुळे झोप तर शांत येईलच सोबत मस्तकाची आगही शांत होईल.
डोक्याला ब्राह्मी वा माक्याने सिद्ध केलेले तेल लावून चांगली मालीश करावी.
रात्री झोपताना एक मोठा ग्लास म्हशीचे दूध साखर व वेलदोडा टाकून प्यावे.
सुमधुर व सौम्य संगीत ऐकत ऐकत झोपेच्या अधीन व्हावे.
चांगले दर्जेदार साहित्य वाचनाची सवय झोपताना लावावी.
दिवसा प्रात:काळी लवकर उठावे व नंतर दिवसा झोप घेऊ नये.
झोपताना आपल्या श्वासगतीकडे लक्ष देऊन शवासन साधून मग गाढ झोपेत जाण्याचा प्रयत्न करावा.
जीवनात आपणास भेटत असणारे सुख दु:ख यांना कुणालाही जबाबदार धरू नये.
सुखाने हुरळून जाऊ नये वा दु:खाने खचून जाऊ नये. कुठलीही परिस्थिती एक सारखी राहत नाही. त्यामुळे आशावादी राहा, तणाव मुक्त राहा. सकारात्मक विचारधारा असू द्या. निश्चितच रात्रीच्या झोपेचा आनंद मिळेल.
