सांगली : जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास योजना परिसरात महापालिकेच्या सफाई कर्मचारी
शिरीप्पा विनायक चौगुले (रा. इंदिरानगर) यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. भांडण सोडविण्यासाठी गेल्याच्या कारणातून हे कृत्य करण्यात आले. चौगुले यांच्यासह अन्य तीन महिलाही जखमी झाल्या. उज्ज्वला सकट, माया काळे, मनीषा चौगुले अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले, वाल्मिकी आवास योजना परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांच्या टोळ्यांचा धिंगाणा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका महिलेलाही टोळ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. फिर्यादी शिरीप्पा चौगुले या इंदिरानगर परिसरात राहतात. पाहुण्यांना भेटण्यासाठी त्या वाल्मिकी आवासमध्ये गेल्या होत्या. यावेळी पाहुण्यांना संशयित मारहाण करीत होते. त्यावेळी त्यांचे भांडण सोडविण्यासाठी चौगुले या त्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी चोगुले यांच्याबरोबर संबंधितांचा वाद झाला. त्यातून एकाने तलवारीने आणि एकाने रॉडने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चौगुले यांच्या डोक्यावर, हातावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. चौगुले यांच्यासोबत असलेल्या उज्ज्वला सकट, माया काळे, मनिषा चौगुले यांनाही मारहाण करून जखमी केले. चौगुले यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या मारहाणीत काही रेकॉर्डबरील गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पोलिस उपाअधिक्षक अजित टिके यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.