इस्लामपुरात किरकोळ कारणावरून गुंडाचा खून
इस्लामपूर : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून निनाईनगरमध्ये रात्री येथे संतोष कदम या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाला आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अजित हेमंत पाटील, सुरज पांड्या, प्रतिक पाटील यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मारेकरी पसार झाले असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संतोष कदमवर काही महिन्यापुर्वी मोका अंतर्गत कारवाई झाली होती.सध्या जामिनावर तो बाहेर होता. काल रविवारी (ता. २८) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तो मृत झाला.
अजित पाटील आणि संतोष कदम या दोघांच्यात येथील बहे नाक्यावर किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. वादावादीनंतर घरी गेलेल्या अजित पाटीलने नंतर सोबत काहीजणांना घेऊन निनाईनगर येथे जाऊन संतोष कदमला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या कदमवर उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.