सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे कोरोना योद्धा पोलिसांचा सत्कार : गाफील राहू नका,सतर्क रहा -गृहमंत्री अनिल देशमुख

सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे कोरोना योद्धा पोलिसांचा सत्कार : गाफील राहू नका,सतर्क रहा -गृहमंत्री अनिल देशमुख


कोरोनाचे संकट वाढत असताना रात्रंदिवस कार्यरत राहत संसर्गाची भिती असतानाही पोलिसांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच आपत्ती सेवा पदकाने पोलिसांना गौरविण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. कोरोनाच्या पार्श्वसभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले.उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल व अशोक वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गाफील राहू नका

यावेळी बोलताना ना. देशमुख म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून पोलीस विभाग, आरोग्य विभाग, संपूर्ण प्रशासन अविरत कार्यरत आहेत, कोरोनाच्या महामारीत संक्रमण रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून अनलॉक काळात संक्रमणाचा धोका अधिक तीव्र होणार आहे, त्यामुळे गाफील राहू नका, संक्रमण वाढ़ नये यासाठी अधिक सतर्क रहा , असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

अनलॉकचा काळ

ते पुढे म्हणाले, लॉकडाऊन काळ संपून अनलॉकचा काळ सुरू झाला आहे. परगावी. परराज्यात गेलेले श्रमिक, मजूर उद्योगधंदे सुरू होऊ लागल्याने पुन्हा येत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज ठेवा, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. कोविड च्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या विविधांगी कामामुळे पोलीसांची प्रतिमा सर्वाधिक उंचावली आहे.

कोरोना बाधित पोलीस

या काळात अनेक कर्मचारीही राज्यभरात कोरोना बाधीत झाले आहेत. त्यांना चांगल्या उपचाराच्य सुविधा निर्माण करण्यात आल्या असून एखाद्या कर्मचाऱ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला ६५ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत त्यांचे कुटुंबिय शासकीय निवासस्थान मध्ये राह शकेल, असाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगून कोरोना काळात चांगली सेवा बजावणाऱ्या ना आपत्ती सेवा पदक देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रातिनिधिक सत्कार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते सत्कार होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. पोलीस दल सक्षम करण्याचे, पोलीस दलात सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास निर्माण करण्याचे काम गृहमंत्री अनिल देशमुख करत आहेत, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

२४ तास सेवा

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्तीच्या काळात रात्रंदिवस तैनात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा यामध्ये महत्वपूर्ण योगदान जिल्हा पोलीस दलाने दिले आहे.शासनाकडून पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझरसह पीपीई कीट देण्यात आले. कोरोना संकट काळात सांगली पोलिस दलाने 24 तास सेवा बजावली. जिल्ह्यातील सर्व सीमांवर खडा पहारा पोलिसांनी दिला. यात जिल्ह्यातील एकाही पोलिसांस कोरोनाची लागण झाली नाही. यापुढेही अशी सेवा बजावतील, असे सांगून सॅनिटायझर, संरक्षक सामग्रीचां पुरवठा जिल्ह्याला झाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणारे डॉक्टर्स तसेच कोविड काळात पोलीसांना मदत करणाऱ्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शहीद जवान यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी मानले.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...