रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच : गृहमंत्री अनिल देशमुख यांची सांगलीत घोषणा
सांगली : राज्यात रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल, अशी आश्वासक भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली. कोरोनाच्या युद्धात मृत्यू पावलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थान राहता येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
भरती प्रक्रिया
ते पुढे म्हणाले ,कोरोनाने देशात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. प्रस्तावित अशी आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया रद्द झाली होती. त्यामुळे तरूणाईत एक धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर बोलतांना श्री. देशमुख म्हणाले,कोरोना संकटामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. लवकरच प्रक्रिया राबवली जाईल.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चिंता
देशमुख म्हणाले,कोरोनाच्या युद्धात आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घराची चिंता करू नये. सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकी अधिकृत निवासस्थान राहता येईल. सरकार माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे कोरोनाच्या अनुषंगाने कर्तव्यावर असतान ५८ जणांचा बळी गेला आहे. ही खेदाची बाब आहे. त्यासाठी शासन पातळीवरून ६५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच ५५ वर्षावरील १२ हजार पोलिसांना पगारी सुटी देण्यात आली आहे. तसेच ५० ते ५५ वर्षातील २३ हजार पोलिसांना ताणविरहित ड्युटी देण्यात आली. तसेच पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष काळजी या काळात घेतण्यात आली आहे.
यंदा पंढरीची रद्द
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,कोरोना संसर्गाने यंदा वारी रद्द केल्याने ३० जूनला राज्यातील विविध भागांतून येणाच्या मानाच्या नऊ पालख्या हवामानाचा अंदाज घेऊन विमानाचे अथवा हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणायच्या या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी होते. मात्र, आता कोरोनाचे संकट राज्यावर आले असल्याने वारकऱ्यांनी घरातच पांडुरंगाची सेवा करावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही आणि सर्वांचा जीव सुरक्षित असेल.३० जूनपर्यंत सर्व मानाच्या पालख्या पंढरपूर मध्ये दाखल होतील.प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांच्या मठात दाखल होतील.
