सांगलीच्या प्रभाग १६ मधील पोलीस वसाहतींची दुरुस्ती करा, तुरुंग अन्यत्र स्थलांतरित करा : नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांची गृह्मंत्र्याकडे मागणी
सांगली : सांगली, मिरज कुपवाड शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेविका सौ स्वाती शिंदे यांनी गृहमंत्री,मा.नामदार अनिल देशमुख यांच्याकडे प्रभागातील पोलिस वसाहतींची दुरुस्ती करावी तसेच याच प्रभागातील कारागृहाचे स्थलांतर क रावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग 16 मध्ये सुमारे 100 वर्षापूर्वी बांधलेल्या पोलीस वसाहती आहेत. त्यांची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. मागील वर्षीच्या महापुरामुळे तर या वसाहतींची वाताहत झाली आहे. घरादाराची पर्वा न करता कोरोना शी 24 तास लढणाऱ्या पोलिसांना अत्यंत धोकादायक आणि गलिच्छ वातावरणात राहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने या प्रश्न इ लक्ष घालून पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी व नव्याने बांधणी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश द्यावेत आणि आणि निधीची देखील तरतूद करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर याच प्रभागातील जिल्हा मध्यवर्ती कारागृह हेही संस्थानकालीन असून क्षमतेपेक्षा जास्त कैदी या कारागृहांमध्ये असतात.अत्यंत दाट लोकवस्तीच्या परिसरात शहराच्या मध्यवस्तीत हे कारागृह असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कैद्यांना राजवाडा परिसरातील शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे.कोरोनाची साथ जर वाढली आणि कारागृहामध्ये कोरोनाचा फैलाव झाला तर कारागृह व शाळेतील कैद्यांमुळे संपूर्ण परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो.
ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरा मध्ये देखील कारागृह परिसरामध्ये आठ ते नऊ फूट पाणी आल्याने कैद्यांचे स्थलांतर करावे लागले होते.त्यामुळे अधिक कैद्यांची क्षमता असणारे नवे कारागृह बांधण्यासाठी नव्या जागेचा शोध घेऊन निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.तरी याबाबत देखील आपण आवश्यक ते आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.