कोरोनाचा शिरकाव भारतात झाला आणि पंतप्रधानांनी लॉक डाऊन ची घोषणा केली. सारच ठप्प झाले. सांगलीत ही परिस्थिती वेगळी नव्हती. उद्योग बंद होते, नोकऱ्या थांबल्या होत्या. सर्वांना त्याचेच महत्त्व वाटत होते. मात्र उद्याची पिढी म्हणून ज्यांच्याकडे आशा लागलेली असते, त्या विद्यार्थ्यांचं भविष्यच अंधारमय झालं होत. शिक्षणच थांबलं होत. याची खंत, जाणीव आणि मुलांचं शिक्षण थांबू नये अशी कळकळ जातिवंत शिक्षकालाच असू शकते.
सांगलीच्या राणी सरस्वती कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता माने यांनाही हीच खंत लागून राहिली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे ही ऊर्मी गप्प बसू देत नव्हती.
इकडे शासन स्तरावरही विचार विनिमय सुरू होते. आणि त्यातून पुढे आली ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना.
हीच संकल्पना कृतीत आणायच ठरवून मुख्याध्यापिका सौ माने यांनी शाळा समिती, व्यवस्थापन समिती, टेक्निकल इन्चार्ज यांच्याशी चर्चा, विचार विनिमय करत शाळे तर्फे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे प्रारंभी 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्चुअल क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. अद्याप त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याला ही कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध नाही. शाळेतील बरेचसे विद्यार्थी गरीब आहेत. पालकांकडे असलेला मोबाईल वापरायचा तर त्यांच्या घरात असण्याच्या वेळा पाळण महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल याचाही विचार मुख्याध्यापिका सौ माने करत आहेत. कारण कोणत्याही परिस्थितीत शिक्षण थांबू नये हीच तळमळ त्यांना आहे. लवकरच इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. पालकांनीही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अतिशय आवश्यक असलेलं शिक्षण थांबू नये, यासाठी आपल्या पाल्यानी या वर्चुअल क्लासेस ना नियमित हजेरी लावावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्याध्यापिका सौ माने यांनी केले.