बंगळूर : येथील सँकी तलावानजीकच्या शिवपुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी कर्नाटक रणधीर पथकाचा अध्यक्ष 'चेतनगौडा याच्यासह ७ जणांना पोलिसांनी रविवारी अटक केली. हा पूर्वनियोजित कट होता. तीन दिवस पाहणी केल्यानंतर चौथ्या दिवशी पुतळ्याची विटंबना केल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी चेतनगौडासह त्याचे साथीदार माजी आमदार टी. नारायणकुमार यांचा पुत्र गुरुदेव नारायणकुमार, वरुण, नवीनगौडा, विनोद, चेतनकुमार, योगेश यांना अटक करण्यात आली आहे. बंगळूर मध्यवर्ती विभागाचे डीसीपी एम. एन. अनुचेत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
या कृत्यामध्ये सुमारे १३ कन्नड कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची माहिती अटकेतील संशयितांनी दिली आहे. त्यांच्याबाबतही माहिती संग्रहित करण्यात आली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रामध्ये लाल-पिवळा ध्वज जाळल्यानंतर यास विरोध म्हणून काही कन्नड कार्यकर्त्यांनी सदाशिवनगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शिवपुतळ्याची विटंबना करण्याचा कट आखला. याकरिता १४ डिसेंबरपासून पाहणी करण्यात येत होती. १५ डिसेंबरच्या रात्री पुतळ्याच्या आसपास काही जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना दिसून आले. त्यांनी त्या कार्यकत्यांना तेथून हुसकावले. पुतळा उंचीवर असल्याने त्या ठिकाणी शिडी आणून ठेवण्यात आली होती.नियोजनानुसार चेतनगौडा व त्याचे काही साथीदार १६ रोजी मध्यरात्री पुतळ्याच्या ठिकाणी आले. त्यांनी पुतळ्याची विटंबना केली. तिघांनी खाली थांबून मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग केले. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केले. दोन रिक्षा आणि एका मोटारसायकलवरून एकूण १३ कन्नड कार्यकर्ते पुतळ्याच्या ठिकाणी आले होते. या कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आणखी काही जणांचा शोध घेतला जात आहे.शिवपुतळ्याची वरुण आणि विनोद यांनी विटंबना केली. खाली उभारलेल्या नवीनगौडाने व्हिडीओ शूटिंग केले. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरस करण्यात आला.