सणबूर : सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचारा करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर संशयित नराधमाने पिडीत मुलीचा मृतदेह जवळच असलेल्या डोंगरातील ओघळीत टाकून दिला. पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील रुवले (सुतारवाडी) येथे बुधवार दि.२९ रोजी दुपारच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ढेबेवाडी पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळत १२ तासांच्या आत त्याला अटक केली आहे.
संतोष चंद्र थोरात (रा. रुवले- सुतारवाडी, ता. पाटण, जि. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे
नाव आहे. संतोष थोरात हा बुधवारी दुपारी वैरण आणण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस सोबत घेऊन जवळच असलेल्या शिवारात गेला. संशयित हा पिडीत चिमुरडीच्या ओळखीचा असल्याने ती त्याच्याबरोबर शिवारात गेली. तिथे गेल्यावर संशयिताने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून
केला ब मृतदेह डोंगरातील ओघळीत टाकून देत नराधम घरी आला. सायंकाळी पिडीत अल्पवयीन मुलीची आजी घरी आल्यावर मुलगी घरात नसल्याचे तिच्या लक्षात आले. ही घटना पिडीत अल्पवयीन मुलीच्या आजीने ग्रामस्थांच्या कानावर घातली. विशेष म्हणजे पोलिसांसोबत संशयित नराधम देखील पिडीतेला शोधण्यासाठी फिरत होता. नंतर पोलिसांनी पिडीतेच्या घराशेजारील नथुराम सुतार यांच्या घरावर बसवलेले
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित नराधम संबंधित अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आले.